अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील रणाईचे येथील खळ्यांना लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
रणाईचे येथील दिलीप अजबराव पाटील तसेच आधार राघो पाटील यांच्या खळ्याला दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी चार्याने तत्काळ पेट घेतल्याने चाहुबाजुने आगीचे लोळ उठले. खळ्यात म्हशी बांधलेल्या असल्याने त्या ओरडू लागल्या. त्या वेळी गावकर्यांनी धाव घेत मिळेल त्या साधनाने पाणी मारणे सुरू केले. मात्र उष्णतेमुळे जवळ उभे राहणे ही कठीण झाले होते.त्याचवेळी रणाईचे येथून जानव्याला पिण्याचे पाण्याचे टँकर नेणार्या चालकाला दुरून आग दिसली. यामुळे तो सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून मागे परतला आणि टॅकरमधील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आटोक्यात आली नाही. यानंतर नगरपालिकेचे दोन टँकर मागविण्यात आले. अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार, फारुख शेख, जाफर खान, मच्छिंद्र चौधरी, दिनेश बि हाडे, भिका संदानशीव,रफिक खान, आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दोन तासानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत दिलीप पाटील याच्या मालकीचा तीन लाखाचा चारा व एक लाखाचे शेती अवजारे जळून खाक झाले तर आधार राघो पाटील यांचे २ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. गावकर्यांनी तीन म्हशी खळ्यातून बाहेर काढल्या. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी.भोई, एस. बी.रामोळ, एम. एस. पाटील, पी. ए. पाटील यांनी वेळीच म्हशींवर उपचार केल्याने म्हशींचे प्राण वाचले. तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला. या आगींचे कारण समजू शकले नाही. तथापि, उन्हामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पहा : रणाईचे येथील आगीचा हा व्हिडीओ.