धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव-चोपडा रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये एका भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून, यात गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आग इतकी भीषण होती की, काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले. आकाशात धुराचे काळे लोट आणि आगीचे लोळ लांबूनच दिसत होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या अगदी जवळच महावितरणचे १३२ केव्ही क्षमतेचे सब स्टेशन आहे. जर आगीच्या ज्वाळा या सब स्टेशनपर्यंत पोहोचल्या असत्या, तर शहराचा वीजपुरवठा खंडित होण्यासोबतच मोठा स्फोट होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने ही मोठी दुर्घटना टळली आहे.

आगीची माहिती मिळताच धरणगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची तीव्रता पाहता तातडीने शेजारील अमळनेर आणि एरंडोल येथूनही अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तिन्ही ठिकाणच्या अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सद्यस्थितीत आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक मदत कार्यात सहकार्य करत आहेत.



