मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रवर्तन चौकातील दुकानांना रात्री लागलेल्या आगीत लक्षावधी रूपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, काल रात्री मुक्ताईनगर शहरामध्ये मधोमध असणार्या परिवर्तन चौकाच्या लगतच दोन ते तीन दुकानांना अचानक आग लागली. या दुकानांमधून आगीचे लोळ उठतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पल चे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान व किराण्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले.
दरम्यान, नागरिकांनी प्रयत्नांची शर्थ केल्यामुळे अग्निशमन पथकाची गाडी येण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. तथापि, या आगीत सुमारे सहा ते सात लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.नागेश मोहिते व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. यामुळे काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आली.
ही आग नेमकी कशामुळे लागली ? याची माहिती मिळाली नाही. तथापि, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्याने परिसरात बराच वेळ गोंधळ उडाला होता.