धुळे प्रतिनिधी । जळगावच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्या आक्षेपार्ह छायाचित्रांबाबत अखेर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियात ही छायाचित्रे व्हायरल करणारे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
याबाबत वृत्त असे की, एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असलेली छायाचित्रे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. यातील व्यक्ती खासदार ए.टी. पाटील असल्याचे दिसून येत असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. ही छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळेच ए.टी. नानांचे लोकसभेचे तिकिट कापण्यात आल्याची बाब उघड होती. याबाबत आजवर पोलीसात तक्रार देण्यात आली नव्हती. आता मात्र या छायाचित्रात असणार्या महिलेने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
धुळे येथील देवपूर भागात राहणार्या एका ४४ वर्षाच्या महिलेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे की, ओळखीचे असलेल्या ए. टी. पाटील यांच्यासोबत शरीर संबंध ठेवणे ही वैयक्तिक बाब असताना अज्ञात व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे संबंधित महिला व पाटील यांची बदनामी झाली आहे. २१ फेबुवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता, असे तक्रारीत नमूद केले आहे. यावरुन पश्चिम देवपूर पोलिस स्थानकात भादंवि कलम ५०० सह भारतीय तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६, (ई), ६७ ( अ) प्रमाणे गुन्हा (२१/२०१९) दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तीने हे फोटो व्हायरल करुन बदनामी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आता हे प्रकरणी पोलिसात गेल्यामुळे आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करणारे गोत्यात येण्याची शक्यता आहे. सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियात कुणीही ही छायाचित्रे प्रसारित केल्याचे असल्यास ते शोधता येणार आहे. यामुळे आता संबंधीत छायाचित्रे व्हायरल करणार्या आंबटशौकिनांची गोची होणार आहे.