महाड | येथे पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच कानात लगावण्याची भाषा केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा सुरू असून यात त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. या अनुषंगाने महाड येथील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. आज ७४ वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात अमृत महोत्सवी नाही हिरक महोत्सवी अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
या मुद्यावरुन नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे, असे म्हणत सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, नारायण राणे यांनी एकेरी आणि आक्षेपार्ह शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी महाड पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार राणे यांच्या विरोधात भादंवि कलम १५३, १८९, ५०४, ५०५(२) आणि ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत पोलिसांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.