जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात गोत्यात आलेले माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तब्बल चार कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील सत्ता संघर्षात एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या दोन मातब्बर नेत्यांमध्ये पडद्याआड अनेकदा शह-काटशहाचे राजकारण रंगत असते. यातच महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना गिरीश महाजन यांच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला मराठा विद्याप्रसारक मंडळातील अंतर्गत कलहाची किनार होती. तर, खडसेंच्या सांगण्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात केलेले स्टींग ऑपरेशन समोर आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता हेच ॲड. प्रवीण चव्हाण नव्याने वादात सापडले आहेत. तब्बल चार कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपातून चव्हाण, त्यांचे पुत्र आणि अन्य तीन अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण त्यांच्याविरुद्ध दाखल एका गुन्ह्यात तेजस रविंद्र मोरे (रा. जिल्हा परिषद कॉलनी जळगाव) यांनी जवाब दिला आहे. यामुळे आपल्यावर दबाव आणत ऍड. प्रविण चव्हाण आणी त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण यांनी तिघांना हाताशी धरुन आपल्याला चार कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप तेजस मोरे यांनी केला आहे.
या प्रकरणी ॲड. प्रविण पंडीत चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय प्रविण चव्हाण यांच्यासह विलास शांताराम आळंदे, निखिल विलास आळंदे, आणि स्वप्निल विलास आळंदे ( सर्व रा. पुणे ) या पाच जणांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख करत आहेत.