जळगाव प्रतिनिधी | जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण विरभान पाटील यांच्यावर करण्यात आलेला गोळीबार हा सुनियोजीत असून यातील मुख्य सूत्रधार हा वेगळाच असल्याची शंका असल्याने हा सूत्रधार शोधून काढावा अशा मागणीचे निवेदन आज मराठा सेवा संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबाराने प्रचंड खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने आज मराठा सेवा संघातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस अधिक्षकांच्या वतीने हे निवेदन अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही जण अद्याप फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणातील खरा सूत्रधार वेगळा असल्याची चर्चा शहरात होत आहे. या अनुषंगाने खर्या सूत्रधाराला तातडीने गजाआड करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर राम पवार, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, श्रीराम पाटील, सुरेंद्र पाटील, विजय रमेश पाटील, डी. डी. बच्छाव, दिलीप पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.