मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता येत नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून केवळ पदवीधर किंवा समकक्ष पात्रता असलेला व्यक्तीच मतदान करू शकतो. विधानपरिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एक बारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर असलेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण 72 सदस्य आहेत. त्यापैकी 6 सदस्य पदवीधर मतदारसंघातून येतात.
पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत. तसेच संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडून येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो. शिक्षकांच्या मतदारसंघात, माध्यमिक किंवा उच्च विद्यालयामध्ये जे पूर्ण वेळ शिक्षक आहे, ते शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करतात. किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अशा राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत आहे, अशा व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरता येतो.