बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीजबिल तयार होताच ऑनलाईन पाठविण्यात येते. अकोला परिमंडलात सर्व वर्गवारीतील 14 लाख 14 हजार 718 पैकी 13 लाख 38 हजार 992 अर्थात 94.65 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.
महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल अॅपद्वारे प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेतील एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ चार ते पाच दिवसांत वीजबिल तयार करून ते मोबाईलवर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी गरजेची आहे. विशेष म्हणजे अशा ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेल या दोन्हीवरही दरमहा वीजबिल मिळविता येईल.
अकोला मंडलातील 4 लाख 69 हजार 89 पैकी 4 लाख 45 हजार 649, बुलढाणा मंडलातील 6 लाख 68 हजार 895 पैकी 6 लाख 34 हजार 551 तर वाशीम मंडलातील 2 लाख 76 हजार 734 पैकी 2 लाख 58 हजार 792 ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे.
प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काऊंट साठी सोईचे:-
वीजबिलाच्या तारखेपासून 7 दिवसांत भरणा केल्यास एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळते. त्याची तारीख वीजबिलात नमूद असते. एसएमएस किंवा ई-मेलवर वीजबिल घेतल्यास ही सूट मिळविणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस याची माहिती मोबाईलवर येते. त्यामुळे सर्व ग्राहक तसेच जे वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत त्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
….तर करा मोबाईल नंबर अपडेट:-
काही ग्राहकांचे चुकीचे क्रमांक नोंदवलेले असू शकतात, अशा ग्राहकांनी आपला अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा. तसेच ज्या ग्राहकांना आधी नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनीही नवीन क्रमांक नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी करा ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी
१. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण अॅपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे.
२. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून 9930399303 क्रमांकावर एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते.
३. याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करता येते.