
रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील बांधकाम कामगार कार्यालय हे गरिबांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असले तरी प्रत्यक्षात येथे गरीब व गरजू नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने खासगी पंटरांच्या माध्यमातून लाभार्थ्यांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचे प्रकार समोर आले असून, संतप्त महिलांनी आमदार अमोल जावळे यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बांधकाम कामगार नोंदणी व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या महिलांना व पुरुषांना ‘ऑनलाईन फॉर्म बाहेरून भरावा लागेल’ असा दबाव टाकण्यात येतो. त्यानंतर लाभार्थ्यांना थेट खासगी पंटरकडे पाठवले जाते, जे एका फॉर्मसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे घेतात. विशेष म्हणजे, हे पंटर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने व संगनमतानेच कार्यरत असल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. काही महिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पंटरविरोधात तक्रार केल्यास अधिकारी वैभव शिंदे यांच्याकडून उलट झिडकारले जाते, तसेच पंटरचीच बाजू घेतली जाते.
या प्रकारामुळे अनेक गरजू कुटुंबे सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. कार्यालयात नियुक्त काही कर्मचारी दिवसभर निष्क्रिय राहतात आणि कामापेक्षा मौजमजेत गुंतलेले असतात. यामुळे महिलांना अनेक वेळा कार्यालयात तासन्तास पायपीट करावी लागते. त्यांची गैरसोय आणि मानसिक त्रास होत आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या महिलांनी संबंधित निष्क्रिय कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करून, त्यांच्या जागी सेवाभावी आणि इमानदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच, आमदार अमोलभाऊ जावळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेमध्ये तीव्र असंतोष उसळण्याची शक्यता आहे.



