नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले. यावर प्रतिक्रिया देतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंदीचा इन्कार केला आहे. उद्योग प्रतिनिधींची भेट घेण्यासाठी आलेल्या असतांना सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, मी येथे उद्योग प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आले आहे आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे याविषयीच्या सूचना घेण्यासाठी आले आहे. बहुतांश नोकऱ्या संघटित क्षेत्रात निर्माण होतात आणि त्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. बँकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कोणतीही गदा येणार नाही. अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात घसरण झाल्याच्या मुद्द्यावर सीतारामन म्हणाल्या की सरकार इलेक्ट्रिक वाहनांना उत्तेजन देणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.