नवी दिल्ली । पीपीएफसह अन्य लहान बचत योजनांचे व्याजदर आधीप्रमाणेत राहिल अशी घोषणा आज निर्मला सीतारामन यांनी केली आहे. हे दर कमी केल्यामुळे चौफेर टीका झाल्यामुळे अर्थमंत्र्यांनी घुमजाव केले. तर हा आदेश ‘चुकून’ निघाल्याचे अफलातून कारण निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.
काल केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीपीएफ व राष्ट्रीय बचत पत्रासारख्या योजनांत अल्पबचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्यांना सरकारने मोठा झटका दिला होता. वित्त मंत्रालयाने १ एप्रिलपासूनच्या नव्या तिमाहीसाठी व्याजदरांत बुधवारी मोठी कपात करण्याचे जाहीर केले. सर्वाधिक १.१% कपात एका वर्षाच्या मुदत ठेवींवर झाली. पीपीएफमध्ये ७० तर राष्ट्रीय बचत पत्रात ९० बेसिस पॉइंटची कपात झाली. बचत खात्यावरील व्याजदरात ०.५% कपात करण्याचे काल जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गरीब व मध्यमवर्गाच्या योजनांवरील व्याजदरात कपात केल्याने संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गत तिमाहीप्रमाणेच व्याजदर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर व्याज दरातील कपातीचा आदेश हा चुकून निघाला असल्याचेही त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये नमूद केले आहे. अर्थात, अर्थमंत्र्यांनी व्याज कपातीचे एप्रिल फुल केल्याची भावना आता व्यक्त होत आहे. तर आता हा निर्णय आणि यावरील घुमजाव वरून सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटण्यास प्रारंभ झाला आहे.