जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यावर ठाम असलेले भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी आज पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने त्यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा शांत झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
आरावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांचे देखील नाव होते. पक्षाच्या वतीने त्यांना शब्द देण्यात आला होता असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर देखील केले होते. एवढेच नव्हे तर उमेदवारीसाठी मुलाखत देऊन आल्यावर चौधरी समर्थकांनी संतोषभाऊंचे जंगी स्वागत देखील करण्यात आले होते. नंतर मात्र श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.
आपल्याला चार राजकीय पक्षांची ऑफर असून आपण उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा संतोष चौधरी यांनी केली होती. यानंतर ते काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत देखील सहभागी झाले नव्हते. तथापि, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी संतोषभाऊ हे लवकरच प्रचारात सक्रीय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता.
दरम्यान, आज जामनेरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजीत मेळावा सुरू झाल्यानंतर संतोषभाऊ चौधरी हे व्यासपीठावर दाखल झाले. यामुळे त्यांची बंडाची भूमिका शमल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांनी आपल्या मनोगतातून भुसावळच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिले. तसेच मतदारसंघात दादागिरीचे उत्तर हे दादागिरीनेच दिले जाईल असेही त्यांनी बजावले. यामुळे आता संतोषभाऊ चौधरी यांचे पॅचअप झाल्याचे मानले जात आहे.