जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कानळदा परिसरातील फेसर्डी, नंदगाव, पिलखेडा, नांद्रा बुद्रुक या गावांमधील अत्यंत जर्जर अवस्थेतील रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने चिखलात बसून आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांची व्हिडिओ बातमी प्रसारित केली होती. या बातमीची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
संबंधित रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्थेत होता. ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे शेतकरी व ग्रामस्थांसाठी अत्यंत कठीण झाले होते. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते आणि शेतीमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत होते. परिणामी, याच मार्गाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हा नऊ किलोमीटरचा रस्ता तातडीने पक्क्या स्वरूपात तयार करण्याचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात पाठवावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, हा प्रश्न फक्त रस्त्याचा नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे आणि याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे.
या आंदोलनामध्ये शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शैलेंद्र चौधरी, सुनील सोनवणे, भगवान धनगर, प्रभाकर कोळी, शेतकरी संघटनेचे राजेश नवाल, आतिश चौधरी तसेच अनेक शेतकरी सहभागी झाले होते. या सर्वांनी ठोस पावले उचलत रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाचा जाब विचारला. शेवटी, जनतेच्या आक्रोशाला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.
संपूर्ण कानळदा-भोकर जिल्हा परिषद क्षेत्रात या आंदोलनाची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चेचे वातावरण आहे. आता जो काम करेल, विकास करेल त्यालाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याची भूमिका पंचक्रोशीतील जनतेने घेतली आहे. यामुळे राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



