अखेर ठरले : देवेंद्र फडणवीसच बनणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला असून भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्याने तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 रोजी लागला. यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीला दणदणीत यश लाभले. यानंतर सत्ता स्थापनेत थोडा विलंब लागला. खरं तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला विनाशर्त पाठींबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेची बार्गेगिंन पॉवर ही जवळपास समाप्त झाली. यातच महायुतीत सर्वाधीक जागा मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर किमान गृहमंत्री तसेच अन्य महत्वाची खाती मिळावीत अशी मागणी लाऊन धरली. यात अनेक दिवस गेल्यानंतर सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला. यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्मला सितारामण आणि विजय रूपाणी यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचीत उमेदवारांची आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली.

या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली.या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव चंद्रकांतदादा पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, संजय सावकारे, डॉ. संजय कुटे आणि इतर आमदारांनी अनुमोदन दिले. यामुळे गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यामुळे आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. फडणवीस हे तिसऱ्यांदा उखमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

दरम्यान, फडणवीस यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा हा उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरील भव्य कार्यक्रमात पार पडणार असून यामध्ये पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह देशभरातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Protected Content