अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोदर्डे शिवारात अवैध वाळू वाहतूक करण्याऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना बघून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग केला असता तो वाहन सोडून पळून गेला. त्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू उपसा संदर्भात पोलिसांनी चांगलीच कारवाईचे शस्त्र उपासले आहे. परंतु महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातून बोरी नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. बोदर्डे शिवारातील बोरी नदी पात्रातून अवैद्य वाळू वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. हवालदार रविंद्र रावते, मच्छिंद्र भारती, नाना पवार, विजय शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी अवैद्य वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 बी जी 0769) वरील चालकाला हे निदर्शनास आले. त्याने वाहन पळवून लावले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. बोदर्डे फाट्यावर जवळ हा वाहन चालक टॅक्टर जागी सोडून पळून गेला.

पोलिसांनी सहा हजार किमतीची दीड ब्रास वाळू व दीड लाख रुपये किमतीचे ते वाहन ताब्यात घेऊन त्या चालका विरुद्ध (नाव माहीत नाही) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तालुक्यातील अवैद्य वाळू वाहतुकीकडे तहसीलदार व महसूल विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा गौण खनिज चोरीस जाऊन नुकसान होत आहे. असा आरोप होत आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.

Protected Content