मुंबई प्रतिनिधी । नाशिक महापालिकेतील घटना ही अतिशय दुर्दैवी अशी आहे. मात्र यात राजकारण करता कामा नये. यासाठी प्रशासन जबाबदार असल्यामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
नाशिक येथील जाकीर हुसेन रूग्णालयात आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ऑक्सीजनची गळती झाल्याची माहिती समोर आली. याच्या पाठोपाठ या गळतीमुळे अत्यवस्थ अवस्थेत असणार्या अकरा रूग्णांचा मृत्यू झाला असून अजून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने याबाबत विचारणा केली असता त्यांनी यावर राजकारण करता कामा नये असे सांगितले. ते म्हणाले की, ही घटना अतिशय गंभीर असून याला महापालिका प्रशासन थेट जबाबदार आहे. यामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.