चेन्नई वृत्तसंस्था । कोरोनावरील उपाययोजना करायच्या सोडून निवडणूक घेणार्या निवडणूक आयोगाला मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले असून आयोगाच्या अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा संताप व्यक्त केला आहे.
देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना विधानसभा निवडणुकांची गरज नसल्याची टीका कधीपासूनच करण्यात येत आहे. याची आता न्यायालयानेही दखल घेतली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. याची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसर्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी हा संताप व्यक्त केला. देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तुमची संस्था कोरोनाच्या दुसर्या लाटेला जबाबदार आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.