जामनेर तालुक्यात बोगस खताची विक्री; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात सरदार कंपनीचे बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमिनीवरील पिके वाया गेले. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांनी जामनेर तहसीलदार व कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याच्या इशारा प्रशासनाला दिला आहे
जामनेर तालुक्यात अनेक दुकानावर सरदार कंपनीचे बनावट रासायनिक खत विक्री होत असल्याच्या तक्रारी येत असून मोयखेडा, ढालसिंगी, तोंडापूर, खांडवा, मांडवा या परिसरातील शेतकऱ्यांनी सुपर फॉस्फेट व सिंगल सरदार ऍग्रो फर्टीलायझर केमिकल कंपनीचे खत ठिबक संचावरील कपाशी व मिरची पिकाला टाकले होते. सदर खत टाकल्यानंतर कपाशी व मिरची पीक पिवळे पडून खराब झाले आहे. व वाया जात असून यामुळे हजारो हेक्टर कपाशी पिकाची नुकसान झाले असल्याची तक्रार मोयखेडा तोंडापूरसह परिसरातील सुमारे शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली. सरदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा व सर्व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी कृषी कार्यालयात शेतकरी गेले असता कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी काही वेळ रस्ता रोको करून तीव्र आंदोलन केले व जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू असा इशारा प्रशासनाला शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, शकूर राणा यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे व कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी व संबंधित सरदार खताच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.