जळगाव, प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना मिळालेले यश कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रगती करीत असताना इतरांना प्रेरणा द्यावी, असे स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करावे, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील यांनी केले.

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे डॉ.जी.डी. बेंडाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज (दि.२८) अनुसूचित जाती-जमातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मु.जे.महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, फैजपूरच्या धनाजी चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, डॉ.ए.पी. सरोदे, प्रा.यशवंत सैंदाणे उपस्थित होते.
प्रस्तावनेतून भालेराव प्रतिष्ठानचे राजेंद्र भालेराव यांनी कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. यावेळी भरत अमळकर यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण विषयक गरजा पूर्ण करणे आवश्यक असून आपल्या स्वप्नासाठी जगणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, गुणवंतांसाठी सत्कार हा स्फूर्ती देणारा असतो. पाय जमिनीवर ठेवून ध्येय गाठणे गरजेचे आहे. डॉ.पी.आर. चौधरी यांनी, ध्येयासाठी अभ्यास महत्वाचा असून सातत्य ठेवणे, स्पर्धेत टिकून राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले. सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
यावेळी १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, एमफील, पीएचडीधारक यांचेसह स्पर्धा परीक्षा, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवलेल्या १०० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन शरद भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.के.के. वळवी, प्रा.जयेश पाडवी, अॅड.अजित वाघ, प्रबुद्ध भालेराव, विलास यशवंत, वैभव सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.