अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यातील उत्तर दिशेच्या बोरी काठ परिसर हिंस्र प्राण्यांच्या दहशतीत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंगळवाडे गावात शिरून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाच ते सहा जनावरांचा फडशा पाडला आहे. तसेच मुडी दरेंगाव परिसरात चार पाच शेळ्या ठार केल्या आहेत. गांधली पिळोदा शिवारात शेळ्या ,पारडू ,गोर्हा , डुकरे यांच्यावरही हल्ला करून काही जखमी तर काही ठार करण्यात आले आहेत. गावकरी कुत्र्यांनी शिकार केल्याचा दावा करतात कदाचित लांडगे किंवा कोल्हे असावेत. त्याच प्रमाणे आज पहाटे लडगाव येथे काही बकर्या जखमी तर काही ठार करण्यात आल्या. तसेच बोहरा गावाला देखील बिबट्याने गोर्हा खाल्ल्याचे वृत्त आहे.
उत्तर दिशेकडे सातपुडा असल्याने जंगलाकडून हिंस्र प्राणी आले असावेत. उत्तरेकडील बोरी काठ धोक्यात आहे. जोपर्यंत मानवाला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत बिबट्याला पकडले देखील जात नाही असा नियम असला तरी हिंस्र प्राण्यांना पळवण्याची तरतूद निश्चित वनविभागाकडे असली पाहिजे. गोरगरीब शेतकर्यांचे नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थ सतर्क झाला पाहिजे तसे ग्रामपंचायत, प्रशासन व वनविभागाने देखील गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
यामुळे प्रशासनाने दखल घेऊन या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.