मुंबई (वृत्तसंस्था) माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारे समर्थन हे भीतीपोटी असल्याचा आरोप केला आहे. एका इंग्रजी वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांची मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांच्याशी लढत होणार आहे.
प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रिया दत्त दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांना सध्या बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत असल्याबद्दल विचारण्यात आले. यावर हे भीतीपोटी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला वाटत नाही का यामागे भीती हे कारण आहे ? मला तरी असेच वाटतं. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’, असा प्रश्न प्रिया दत्त यांनी विचारला आहे. ‘प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. समाजावर ते प्रभाव पाडतात. पण त्यांच्यावरही जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट मत मांडले पाहिजे’, असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे.