पाचोऱ्यात विनापरवाना औषधी जप्त; अन्न व औषधी विभागाची कारवाई

पाचोरा प्रतिनिधी | जारगाव हद्दीत सुरू झालेल्या कोविड सेंटरलगत विना परवाना औषधविक्री करणाऱ्या मेडिकलवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने ४ लाख ३० हजार रुपये किमतीची औषधी जप्त केली आहे.

पाचोरा-भडगाव मार्गावर जारगाव शिवारात २१ रोजी व्यंकट गोपाळ मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू सरण्यात आले आहे. त्याला लागून दुसऱ्या दिवशी एक मेडिकलही सुरू झाले. मेडिकल संचालक शुभम सुनील पाटील यांनी मेडिकल सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जळगावलाही पाठवला. मात्र परवानगी येण्याअगोदरच औषधीविक्री सुरू केल्याने पाचोरा शहरातील एका व्यक्तीने निनावी फोन करून मुंबई येथील अन्न व औषधी विभागाच्या मुख्य कार्यालयास माहिती दिली. मुंबईहून तातडीने सूत्र हलल्यानंतर सहायक कमिशनर समाधान साळे (धुळे), जळगाव येथील औषधी निरीक्षक डॉ.एम माणिकराव, सहकारी मिलिंद साळी, समाधान बारी, चंदू सोनार या पथकाने पाचोरा येथील व्यंकट गोपाळ मंगल कार्यालयातील मेडिकलवर छापा टाकून ४ लाख ३० हजार रुपये किमतीची औषधी जप्त केली.

Protected Content