पिता-पुत्राला ३९ लाखांचा गंडा; हर्बोलाईफ फ्रँचायझीच्या नावाखाली फसवणूक

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील गणपती नगरातील रहिवासी तसेच, एमआयडीसीत काटून-खोके निर्मितीचा कारखाना असलेल्या पिता-पुत्राला ३९ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. हर्बोलाईफ कंपनीची फ्रान्चायझी (Herbalife franchise) घेऊन देण्याच्या नावाखाली वर्षभरापासून संशयितांकडून त्यांची फसवणूक सुरू होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती नगरात अशोक गिरधर बियाणी (वय-६८) मुलगा निकुंज आणि सून अमृता बियाणी यांच्यासह सुमन रेसिडेन्सीत (Suman Residency Jalgaon ) वास्तव्यास आहेत. अशोक बियाणी यांनी २०१३ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली असून मुलगा निकुंज यांच्या उमाळा येथील पॅकिंग पुठ्ठा-खोके तयार करण्याच्या कारखान्यात मदत करतात.
कोरोना काळात निकुंज बियाणी यांची दिपेश कमलेश रुपानी (Dipesh Kamlesh Rupani) नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. दिपेशने निकुंजला हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन विकत दिले होते. काही दिवसांतच निकुंज यांना त्याचा चांगला परिणाम जाणवला. त्यामुळे दिपेश रुपानीसोबत त्यांची चांगली ओळख झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. याचदरम्यान दिपेशने निकुंजला हर्बोलाईफच्या प्रॉडक्टची फ्रान्चायझी घेण्याचा सल्ला देत, त्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले.

दिपेश रुपानी आणि कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा नावाचा व्यक्ती यांनी बियाणी पिता-पुत्रांना कंपनीची योजना समजावून सांगितली. २२ लाख रुपये गुंतवणुकीचा विषय त्यांनी काढला. तसेच, कंपनीचे जास्त प्रॉडक्ट ॲमेझॉनवर (Amazon) विकले जातील, तुम्हाला घरबसल्या ७० टक्क्यांचा थेट लाभ होईल, असे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

त्यासाठी अन्न व औषधचे परवाने, दुकान परवाना घेण्यासाठी तब्बल ४ लाख ४० हजार रुपये घेतले. नंतर दुकानाचे डिपॉझिट केवळ वीस हजार रुपये असताना ६० हजार रुपये उकळले. बियाणी पिता-पुत्रांनी पहिल्यांदा ४ लाख ४० हजार, दुसऱ्यांदा १७ लाख ५० हजार, तिसऱ्यांदा १७ लाख ६० हजार असे एकूण ३९ लाख ५० हजार रुपये या दोघांच्या सांगण्यावरून गुंतवले. ठरल्याप्रमाणे काही दिवस ७६ हजार रुपये प्रति महिना देण्याचे कबूल केले. मात्र, नंतर आणखी गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होईल, असे सांगून दोघांनी बियाणी पिता-पुत्राला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र, वेळीच सावध होऊन त्यांनी अधिक चौकशी केली असता, दोघांनी हर्बालाईफची सिस्टर कंपनी केअर न्यूट्रिशन कंपनी अस्तित्वात नसल्याचे सांगितले. बियाणी पिता-पुत्रांकडून अन्न व औषध विभागाकडून परवाना, शॉपॲक्ट लायसन्स, दुकान घेण्यासाठी डिपॉझिट घेऊन वेळोवेळी मिळालेल्या रकमांमध्ये हेराफेरी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे ३९ लाख गुंतवून महिन्याला मिळणारी ७६ हजारांची रक्कमही बंद झाली.

फेब्रुवारी महिन्यात हर्बोलाईफचे उत्पादन विक्रीचे दुकानही बंद पडल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर बियाणी पिता-पुत्राने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content