जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात बालाजी इंडस्ट्रीज कंपनीजवळ एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. कंपनीत कामासाठी जात असताना रस्त्यात अडवून त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी धारदार वस्तूने वार करून तरुणाला गंभीर जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६, रा. रायपूर, ता. जि. जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तो आपल्या दुचाकीने कामासाठी कंपनीकडे जात होता. त्यावेळी रस्त्यात मयूर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि कृष्णा शिंदे या दोघांनी त्याचा रस्ता अडवला. कोणतेही कारण नसताना त्यांनी राजकिरणला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाला सुरुवात झाल्यानंतर दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. राजकिरणला मारहाण करत असताना आरोपींपैकी मयूर याने आपल्या हातातील धारदार वस्तूने त्याच्यावर वार केला. या हल्ल्यात राजकिरण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी अवस्थेत राजकिरणला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या गंभीर घटनेनंतर राजकिरण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयूर आणि कृष्णा शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉासंजीव मोरे करत आहेत.



