धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील प्रख्यात वकील अँड. राहुल पारेख यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली असून, त्यांच्या टेबलमधील ४० हजार रुपये जबरदस्तीने लंपास करण्यात आले. तसेच, त्यांना शेताकडे आल्यास आम्ही जिवंत गाडू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे, संपूर्ण प्रकरण?
अधिक माहिती अशी की, अॅड. राहुल पारेख हे धरणगाव प्रथमवर्ग न्यायालयात वकिली व्यवसाय करत असून, शेती देखील करतात. त्यांनी २०२१ मध्ये माजी नगरसेवक राजू महाजन यांच्या नगरपालिकेच्या पेवर ब्लॉकच्या कामात गुंतवणूक केली होती. काल (२३ फेब्रुवारी) सायंकाळी ७.४५ वाजता ते आपल्या कार्यालयात काम करत असताना, त्यांच्या पक्षकाराशी फोनवर चर्चा करत होते. याचवेळी त्यांच्याशी ओळखीचा असलेला वाल्मिक पाटील याने संभाषण ऐकून, “राजू महाजन यांच्याकडून तुला कोणतेही पैसे मिळणार नाहीत, विसरून जा!” असे सांगत शिवीगाळ केली. तसेच, “तू जर पैसे मागितले तर तुला घरात घुसून मारू” अशी धमकी दिली.
रात्री कार्यालयावर हल्ला!
सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर, रात्री ८.०० ते ९.०० च्या दरम्यान, वाल्मिक पाटीलचा भाऊ वासुदेव उर्फ बाळा पाटील आणि इतर ६-७ जण अॅड. पारेख यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले. त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत कार्यालयातील संगणक व प्रिंटरची तोडफोड केली. त्यानंतर वासुदेव पाटील याने हातातील लाकडी दांडक्याने पारेख यांच्या उजव्या पायावर जोरदार मारहाण केली.
जबरी चोरी व जीवघेणी धमकी
याच वेळी, टेबलच्या ड्रॉवरमधील नुकतेच मिळालेले ४० हजार जबरदस्तीने घेऊन हल्लेखोर पसार झाले. जाताना त्यांनी, “वकील राहुल पारेख शेताकडे आला तर त्याला जिवंत गाडू,” अशी धमकी दिली.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात वाल्मिक पाटील, वासुदेव उर्फ बाळा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.