नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भुसावळ ते खंडवा या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी गहूखेडा ते फेकरीदरम्यान २२ किमी लांबीच्या मार्गावर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या भूमी संपादनाचा जोरदार विरोध स्थानिक शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्या अडचणी, नुकसान व रोजगाराच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी थेट दिल्लीतील रेल भवनमध्ये रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांच्यासमवेत शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या बैठकीत मंत्री रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सखोल चर्चा करत भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन प्रकल्पासाठी प्रस्तावित गहूखेडा परिसरातील ८९ हेक्टर शेती जमीन संपादनाविरोधात भूमिका मांडली. या प्रस्तावित संपादनात भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक, साकरी, मन्यारखेडा, जाडगाव, फुलगाव, अंजन सोडा, कठोरा बुद्रुक आणि रावेर तालुक्यातील गहूखेडा या नऊ गावांतील 250 शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे. यामध्ये 130 गट बाधित होत असून काही शेतकरी कायमस्वरूपी भूमिहीन होणार आहेत.

या भागातील शेतजमिनी पूर्वीही अनेक वेळा विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, राष्ट्रीय महामार्ग, धरणे, जलसिंचन प्रकल्प आदींसाठी जमीन दिल्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर तोच अन्याय होऊ पाहत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. संपादनामुळे उर्वरित जमिनीचे विभाजन होऊन शेती करणे अशक्य होते, रोजगाराच्या संधी मर्यादित होतात आणि शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करत मंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमन व सीईओ सतीश कुमार यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधी व अॅड. धीरेंद्र पी. देशमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करून पर्यायी मार्गांची मांडणी केली. या पर्यायांतर्गत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरच प्रकल्प राबवण्यात यावा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याची जमीन संपादित होणार नाही. यासाठी मंत्री महोदयांनी प्रकल्पाचा पुनर्र्सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीस शेतकरी प्रतिनिधी म्हणून माजी सभापती राजेंद्र चौधरी, पर्यावरण अभ्यासक प्रा. के. पी. चौधरी, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, माजी सरपंच व भाजप तालुका उपाध्यक्ष राजकुमार चौधरी, राहुल पाटील आणि इतर शेतकरी उपस्थित होते. अॅड. धीरेंद्र देशमुख यांनी शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडली.



