जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि उत्पादन वाढीसाठी शासनाच्या माध्यमातून ड्रोन द्वारे फवारणी आणि नॅनो खते (लिक्वीड स्वरूपात) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज ड्रॉन आणि नॅनो खते तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते ड्रोन आणि नॅनो खते तंत्रज्ञान जनजागृती मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ड्रोन फवारणी आणि नॅनो खाते तंत्रज्ञानाच्या मदतीने कापूससह इतर पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी बांधवांनी नॅनो खाते वापरावे तसेच ड्रोनच्या साह्याने किमान एकरी ३०० रुपये प्रमाणे फवारणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी वेळेत, प्रदूषण विरहित, युरियाचे नॅनो खाते शासनाकडून उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी उत्पादनाच्या वाढीसाठी ड्रोन आणि नॅनो खते तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकांच्या वाढीसाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.