Home Cities जळगाव शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करावी – रोहित निकम 

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करावी – रोहित निकम 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि पणन महासंघ सज्ज झाले आहेत. हंगाम २०२५-२६ मध्ये नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) च्या माध्यमातून मुग, उडीद, तूर आणि सोयाबीन या कडधान्य व तेलबिया पिकांची खरेदी निश्चित आधारभूत दराने होणार आहे. या संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, त्यासाठी ई-पिक पाहणी ही अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत त्यांच्या पिकांची ई-पिक पाहणी करून आवश्यक दस्तऐवजांसह (७/१२ उतारा) सिस्टिमवर अद्ययावत नोंद करून ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, “केंद्र शासनाच्या आधारभूत दर खरेदी योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र त्यासाठी ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.”

मंत्री तथा महासंघाचे संचालक नामदार संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम व संचालक संजय पवार यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीची खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित असणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर गोंधळ, दलालांचे मध्यस्थीत्व किंवा अनधिकृत हस्तक्षेप टाळता येणार असून, शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत दराने उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध होत असून, बाजारभाव घसरल्यास देखील त्यांना निश्चित दराने हमीभाव प्राप्त होईल. ही संधी गमावू नये म्हणून शेतकऱ्यांनी त्वरित महसूल विभागाशी संपर्क साधून ई-पिक पाहणी करून घ्यावी, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound