अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मोठे नुकसानींचे पंचनामे करावे या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रूपेश सुराणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन लगेच प्रस्ता पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यात १९, २६ आणि २८ जुन रोजी जावखेडा व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतू लाभार्थीच्या यादीत नाव आले नाही. तसेच अनेक शेतात कृषी सहाय्यक किंवा संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी पंचनामे करण्यासाठी आले नसल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. जवखेडा येथे कृषी सहाय्यक दिपाली सोनवणे यांनाही पंचनामे करण्या संदर्भात सांगण्यात आले होते. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व शेतकरी बांधव आले असता तालुका कृषी अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार रूपेश सुराणा यांनी येवून शेतकऱ्यांची नावे घेवून शासनाकडे सोमवारी लगेचच प्रस्ताव पाठवतो असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले.