भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज (दि.३०) येथील तहसीलदारांच्या दालनात खराब झालेली पिके फेकून आक्रोश व्यक्त केला. परतीच्या बेमोसमी पावसामुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरीत मिळावी, या मागणीसाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज गळ्यात पिकांची माळ घालून पंचायत समिती कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढला, यावेळी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे की, तालुक्यात बेमोसमी पावसामुळे ज्वारी,मका , कपाशी , सोयाबीन , उडीद मूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली असून शेतकऱ्याला जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमदार संजय सावकारे यांनी नुकसानीची पाहणी केली नाही, तसेच शेतकऱ्यांनाही भेटलेले नाही. असा आरोप करून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने लांब पंचनाम्याची पध्दत न वापरता सरसकट पिक पेऱ्याप्रमाणे सर्वच पिकांबद्दल १०० टक्के नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या तालुका शाखेसह शेतकऱ्यांनी केली आहे.