ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने शेतकर्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याचे नमूद करत ‘किसान लॉंग मार्च’ अखेर स्थगित करण्यात आला आहे.
ठाण्यातील वासिंद येथे ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकर्यांचे नेते जीवा पांडू गावित उर्फ जे. पी. गावित यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच मोर्चेकरी शेतकर्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या होत्या. यानंतर काल सायंकाळपासून राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू झाली. ही चर्चा पहाटे चार वाजेपर्यंत चालली. यानंतर संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती गावित यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी जीवा पांडू गावित यांनी राज्य सरकारने शेतकर्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपुर्वक विचार केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. आमच्या ७० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित देखील होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आंदोलन स्थगित होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. तथापि, आंदोलक शेतकरी हे ठाण्यातील वासिंद येथे ठिय्या मांडून बसले होते. आता आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्यात आल्याने सर्व शेतकरी आपल्या घरी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.