यावल प्रतिनिधी । ग्रामीण क्षेत्रातील कोरोना विषाणु संसर्ग आणि यातील बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याबाबतची माहिती व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उडीद, मुंग या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माहीती आढावा बैठक संपन्न झाली.
यावल तहसील कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत तालुक्यातील मंडळ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ झाला पाहीजे, याबाबत महसुल प्रशासनाकडून योजनेची अमलबजावणी संदर्भातील माहीती प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडून सविस्तररित्या जाणुन घेतली, त्याचबरोबर यंदाच्या पावसामुळे यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या उडीद, मुंग व आदी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सुचना देण्यात आल्यात.
यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने गावपातळीवर कोरोनाबाधीत रूग्णांना होम क्वारंटाईन करण्याविषयी सर्तक राहण्याच्याही सुचना मंडळ अधिकारी यांना दिल्यात.
यावेळी यावल तालुक्यात आजपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातुन प्रतिमाह २००० रुपयांप्रमाणे रक्कमही ३१ हजार ४०० लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पाठवण्यात येत असून एकुण १ हजार ७०० शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी ही अद्याप विविध कारणांनी झाली नसल्याची माहीती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विभागाचे लिपिक दिपक बाविस्कर यांनी दिली. या बैठकीस तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील उपस्थितीत होते.