Home Cities अमळनेर अमळनेरमधील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच ; मापाईच्या नावाखाली वसुलीचे गंभीर आरोप

अमळनेरमधील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच ; मापाईच्या नावाखाली वसुलीचे गंभीर आरोप

0
105

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर घालणारा गंभीर प्रकार समोर आला असून, लामा जिनिंग येथे सुरू असलेल्या सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार, उपविभागीय कार्यालय अमळनेर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, गेल्या सात ते आठ वर्षांपासून अमळनेर येथील सीसीआय केंद्र बंद होते. अलीकडेच केंद्राचे उद्घाटन झाले आणि पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कापसाचे मोजमाप सुरळीतपणे करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवसापासून कापसात कवडी आहे, कचरा आहे, मऊचर जास्त आहे अशा विविध कारणांचा आधार घेत शेतकऱ्यांच्या मालावर प्रति क्विंटल पाच ते सहा किलोची सर्रास कपात केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याचबरोबर, प्रति क्विंटल २० रुपये मापाईच्या नावाखाली रोख रक्कम घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा किलोची कपात करताना वाहनाचे वजन मोजताना वजनात अ‍ॅडजस्टमेंट केली जात असल्याने काटापट्टीवर शेतकऱ्यांना ही कपात दिसून येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी जर या अन्यायाविरोधात आवाज उठवला, तर केंद्र बंद करून टाकू, तालुक्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकरी भीतीपोटी गप्प बसत असून, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

तसेच अमळनेर तालुक्यात दुसऱ्या जिनिंगमध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्याबाबत विचारणा केली असता केवळ आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात दुसरे केंद्र सुरू केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच केंद्रावर अवलंबून राहावे लागत असून, त्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या गंभीर प्रकरणात शेतकरी प्रतिनिधी सुभाष सुकलाल पाटील, श्रीनगर दला पाटील, दिनेश उत्तमराव पवार, सुरेश पिरन पाटील आणि योगेंद्र रामसिंग पाटील यांनी प्रशासनाने स्वतः लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी ठाम मागणी केली आहे.


Protected Content

Play sound