हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | थंडी आणि मंगू रोगाने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. इतकेच नाही तर पपई आणि तूर हे पीक सुद्धा संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका या पिकांना बसला आहे. जालनासह नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांतील शेतक-यांसमोर त्यामुळे संकट उभे ठाकले आहे.

उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम आता जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी वर्गावर झाला आहे. मालाचे घसरलेले दर पाहता मोसंबी बाजारपेठ अजून दोन दिवस बंद राहणार आहे. अशातच मोसंबी विकसित होण्याच्या स्थितीत असताना मंगू रोगाचे सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला. जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड झाली असल्याने संक्रांतीनंतर तरी भाववाढ होईल का अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतक-यांनी पपई लागवड केली आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे पपई पिकावर मोझेक व डावनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतक-­यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्याने शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. मोझेक रोगामुळे पपईची पाने पिवळी पडून गळून पडत आहेत. त्याचा फटका पपईला बसला आहे.

रबी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा, भुईमूग, या पिकांची पेरणी करण्यात आली असून या पिकांना खते देणे, कोळपणी, निंदणी आदी कामांना वेग आला आहे. परंतु तूर आणि हरभरा पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात तूर पिकावर दवाळ रोगाचे सावट आले आहे. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपली आहे. त्याचा तूर उत्पादनात मोठा फटका दिसला.

Protected Content