जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “भाजपच्या खासदारांनी त्यांच्या पद्धतीने विकासकामे केली आहेत. विकासकामांचा अनुशेष राहिला असेल तो पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा राहील. मग तो विमानतळाचा विषय असेल, शेतीच्या सिंचनाचे काही प्रश्न असतील तसेच युवक व महिलांच्या काही समस्या असतील. या सगळ्या विषयांना न्याय देण्याची माझी भूमिका लोकसभेत असेल,” असे प्रतिपादन जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी येथे केले.
भारतीय जनता पार्टीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्मिताताई वाघ गुरूवारी (ता.14) प्रथमच पक्षाच्या नूतन जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे तसेच रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, भारती सोनवणे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पी. सी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे आदींसह जळगाव शहरातील भाजप व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणताही उद्योग व्यवसाय आपल्या भागात आणायचा असेल तर मूबलक वीज निर्मितीची आवश्यकता भासते. रस्त्याचे जाळे तसेच पाण्याची व्यवस्था लागते. वीज व रस्त्यांचे जाळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु, आपल्याकडे पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याची समस्या सुटल्यास मोठे उद्योग व्यवसाय आपल्या जळगाव जिल्ह्यात येऊ शकतील. गिरणा नदीवरील बलून बंधारे व पाडळसरे धरणाच्या कामाला गती मिळाल्यास शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल. कोरडवाहू शेती सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील. बचतगटाच्या माध्यमातून बँकांसह विविध माध्यमातून महिलांना खेळते भांडवल मिळते, याव्यतिरिक्त महिलांच्या कल्याणासाठी आणखी चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. शेतकरी व विद्यार्थ्यांचे हीत साधण्यासाठी देखील मी लोकसभेत सातत्याने पाठपुरावा करेन, अशी ग्वाही श्रीमती वाघ यांनी दिली.