पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ९९ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
शासन निर्णयानुसार, अवेळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ३ हेक्टरपर्यंत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील ५२,३६४ शेतकऱ्यांना ६९ कोटी ४५ लाख २२ हजार रुपये, तर भडगाव तालुक्यातील ३४,३६९ शेतकऱ्यांना ३० कोटी ०५ लाख ६२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पोर्टलद्वारे जमा केले जाणार आहे. आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
या अनुदानामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी या अनुदानाची मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी आणि अनुदानाबाबत काही अडचण असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.