जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सावकारी जाचाला कंटाळून एका शेतकर्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील डिगंबर चिंधा मराठे यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्मदन करण्याचा इशारा फेब्रुवारीच्या लोकशाही दिनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. यात शालीग्राम बियाणी या अवैध सावकारी करणार्या व्यक्तीने आपली जमीन हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती. मराठे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. यानंतर शालीग्राम बियाणी याला अवैध सावकार म्हणून घोषीतदेखील करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे स्थानिक प्रशासन हे बियाणी याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून डिगंबर मराठे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र इशारा देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले.
आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी साडेबारा वाजेच्या डिगंबर चिंधा मराठे यांनी अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ प्रचंड खळबळ उडाली. उपस्थितांनी त्यांना वेळीच आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र आता त्या अवैध सावकारावर कार्यवाही होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.