जळगाव प्रतिनिधी । सावकाराने जमीन हडप केल्यानंतरही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे उत्राण येथील शेतकर्याने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना समजावण्यात आले असले तरी आता त्या सावकारावर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी डिगंबर चिंधा मराठे यांनी शालीग्राम बियाणी या अवैध सावकारी करणार्या व्यक्तीने आपली जमीन हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती. मराठे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. यानंतर शालीग्राम बियाणी याला अवैध सावकार म्हणून घोषीतदेखील करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे स्थानिक प्रशासन हे बियाणी याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून डिगंबर मराठे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र इशारा देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले.
आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी साडेबारा वाजेच्या डिगंबर चिंधा मराठे यांनी अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वेळीच आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र आता त्या अवैध सावकारावर कार्यवाही होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहा– या सर्व नाट्यमय घटनेचा हा व्हिडीओ.