Home क्राईम अडावद येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचा करुण अंत

अडावद येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचा करुण अंत

0
310

अडावद -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सततच्या नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण अडावद गावावर शोककळा पसरली असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अडावद येथील जगदीश नगरात राहणारे ३६ वर्षीय शेतकरी आबा गोरख महाजन यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी औषधांचे अतिसेवन केले. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने चोपडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी चोपडा शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आबा महाजन यांच्याकडे वरडी शिवारात चार बिघे शेती होती. यावर्षी त्यांनी मूग, उडीद आणि मका पिकांची लागवड केली होती. परंतु, पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग आणि उडदाचे पीक तर पूर्णपणे हातातून गेले. या नुकसानीनंतर त्यांनी कांद्याचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कांद्याची रोपेही खराब झाली. आधीच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते आणि कांदा लागवडीसाठी त्यांनी हातउसनवारी करून पैसे घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १३ वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतकरी आबा महाजन यांची आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर राज्यातील शेतकरी वर्गासमोर उभ्या असलेल्या गंभीर संकटाची शोकांतिका आहे. निसर्गाचा लहरीपणा, पिकांचे नुकसान आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत अडकत चालला आहे. या घटनेने शेती क्षेत्रातील अडचणी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.


Protected Content

Play sound