
चंद्रपूर-वृत्तसेवा । चंद्रपूर जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून ताडोबा जंगलालगतच्या भागात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गतवर्षी वाघांच्या हल्ल्यात तब्बल ४७ जणांचा मृत्यू झाला होता, तर यंदाच्या वर्षातही मृत्यूची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

३० जानेवारी रोजी चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा जंगलालगत असलेल्या चोरगाव येथील उद्धव वारलूजी मोहुर्ले (वय ६५) हे आपल्या शेतात कामासाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते वरवट–चोरगाव मार्गावरील शेतात गेले होते. रोज सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतणे हा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. कंपार्टमेंट क्रमांक ५८५ मध्ये उद्धव मोहुर्ले यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, जानेवारी महिन्यातच जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षात तीन जणांचा बळी गेला आहे. यामध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन, तर बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात तब्बल ४७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून या पार्श्वभूमीवर ताडोबा व आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे.
वनक्षेत्रालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सतत जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वनविभागाने गस्त वाढवणे, धोकादायक वाघांचे हालचालीवर लक्ष ठेवणे आणि गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



