पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तालुक्यातील गाळण बु” येथील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या वर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “आज दि. ९ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी गाळण बु” ता. पाचोरा येथील कैलास बारकु पाटील (वय – ४६) हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा जोरदार कडकाडात होवुन मोठा आवाज झाला. याप्रसंगी कैलास पाटील यांच्या शेजारीच विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
यावेळी काही अंतरावर त्यांच्या पत्नी देखील शेतात काम करत होत्या. त्यांनी एकच आक्रोश करत ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. मयत कैलास बारकु पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.”
यावर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मयत कैलास बारकु पाटील यांचे पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.