पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टिटवी गावात एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने शेतात फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर आणि टिटवी गावावर शोककळा पसरली आहे.
दादू भोमा जाधव (वय ४२, रा. टिटवी, ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास दादू जाधव यांनी आपल्या शेतात फवारणीचे औषध घेतले. काही वेळाने त्यांचे भाऊ आणि मुलगा गोकुळ जाधव शेतात पोहोचले असता, दादू जाधव बेशुद्धावस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच, कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने एका खासगी वाहनातून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.




