यावल प्रतिनिधी । शेतात बकऱ्या चारल्याच्या कारणावरून ४९ वर्षीय शेतकऱ्याला चार जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील तहसील कार्यालयासमोरील शेतात घडली. याप्रकरणी रात्री यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नितीन वसंत महाजन (वय-४९) रा. महाजन गल्ली यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे यावल तहसील कार्यालयासमोर शेत आहे. गुरूवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी नितीन महाजन यांच्या शेतात गावातील शेख आमीन शेख महमूद याने त्याच्या बकऱ्या चारल्या होत्या. याबाबत विचारणा केली असता याचा राग आल्याने संशयित आरोपी शेख आमीन शेख महमूद, रहिम सईद खाटीक, रहिम अजगर खाटीक आणि रईस खान मुकद्दर खान चौघे रा. खाटीक वाडा यावल यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. यासंदर्भात नितीन महाजन यांनी रात्री यावल पोलीस ठाण्यात चौघांविरेाधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ असलम खान करीत आहे.