पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसवे येथील आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबियांना आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने एक लाख रूपयांची शासकीय मदत मिळाली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील म्हसवे येथील शेतकरी घनशाम शामराव पाटील यांचे चिरंजीव गजानन घनशाम पाटील यांनी कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केली होती. गजानन हे कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या कुटुंबियांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधुन सर्व परिस्थिती सांगितली. आमदार पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून गजानन यांच्या कुटुंबियांना आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला अर्थसहाय्य म्हणुन उभारी योजनेच्या अंतर्गत एक लक्ष रूपये मंजुर करून आणले.
आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी गजानन यांच्या कुटुंबियांना म्हसवे येथिल सरपंच सतीश संदानशिव, म्हसवे येथील उपसरपंच सुधाकर लोटन पाटील, म्हसवे येथिल तलाठी गौरव लांजेवार, पारोळा शहर तलाठी निशिकांत माने, फौजदारी लिपिक विठ्ठल वारकर, म्हसवे येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम बोरसे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हे अर्थसहाय्य मिळाल्याबद्दल कुटुंबियांनी आमदार चिमणराव पाटील, तहसिलदार, पारोळा, सरपंच, उपसरपंच, म्हसवे तसेच सर्व म्हसवे ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शहर तलाठी यांचे आभार मानले आहे.