तोतया जीएसटी अधिकारी जेरबंद; न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांकडे लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अधिकारी भाऊसाहेब ठाकरे याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी एमआयडीसीतील अशोक ट्रेडर्स कंपनीतून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारा भाऊसाहेब ठाकरे हा अधिकाऱ्यांसारखे राहत व बोलत सर्व बनवाबनवी शिकला व त्यातूनच तो जीएसटी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पोहचू लागल्याचे पोलिस तपासात समोर आले.

जीएसटी विभागाचे अधिकारी कारवाईसाठी जात असताना भाडेतत्वावर वाहने घेऊन जातात. त्या वाहनांवर भाऊसाहेब ठाकरे हा चालक होता. अधिकारी कोणत्या ठिकाणी जातात, कोणाला भेटतात, त्यांच्या कारवाईची, माहिती घेण्याची तसेच कागदपत्रे तपासणीची पद्धत कशी आहे, हे सर्व ठाकरे याने हेरले. त्यातून तो मग तोतयागिरी करू लागला. अशाच प्रकारे त्याने जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात अनेक उद्योजकांकडे जाऊन धमकावले. असाच प्रकार शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू असताना उद्योजकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Protected Content