फैजपूर–यावल एसटी बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांमध्ये समाधानाची भावना


यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल ते फैजपूर दरम्यान बामणोद–म्हैसवाडी–चिखली–भालोद मार्गाने धावणारी महत्त्वपूर्ण एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांमध्ये मोठ्या समाधानाची भावना व्यक्त होत आहे. तब्बल एक वर्ष बंद असलेली ही सेवा सुरू व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने मागणी होत होती.

ही बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी म्हैसवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुजित भागवत चौधरी यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीचे ठराव, एसटी अधिकाऱ्यांशी अनेकदा संवाद अशा विविध स्तरांवर प्रयत्न करूनही काही काळ प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रावेर–यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनंतर हा प्रश्न मार्गी लागला.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन आमदार जावळे यांनी तात्काळ यावल आगार व्यवस्थापक दिलीप बी. महाजन यांच्याशी संपर्क साधत बससेवा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजता यावल–सांगवी–भालोद–चिखली–म्हैसवाडी–बामणोद मार्गे बस फैजपूरकडे रवाना झाली. दुपारी चार वाजता फैजपूरहून याच मार्गाने बस पुन्हा यावलकडे परतणार आहे.

बससेवेचे उद्घाटन अनौपचारिक स्वरूपात म्हैसवाडी येथे झाले. सकाळी बस गावात पोहोचताच सरपंच सुजित चौधरी यांच्या हस्ते ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एसटी बसची विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी गावातील नागरिक, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे पासेस तयार करण्यासाठी सरपंच स्वतः यावल आगारात जाऊन कार्यवाही करत होते, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

नवीन सुरू झालेली बससेवा विशेषतः विद्यार्थिनींसाठी दिलासादायक ठरली आहे. रोजच्या प्रवासातील अडचणी आता दूर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच रस्ता सुधारल्याने बससेवा नियमितपणे चालू राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सेवेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून या मार्गावरील बससेवेचे महत्त्व स्पष्ट होते.