फैजपूर, ता. यावल-प्रतिनिधी | उपनिबंधकांनी दिलेल्या निकालानंतर देखील शेतकर्यांना जमीन मिळत नसल्याने उपोषणाला बसलेल्या तीन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल आणि रावेर तालुक्यातील सावकारांनी हडप केलेल्या जमिनी मूळ शेती मालकांना परत देण्याचा ऐतीहासीक निकाल जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. या अनुषंगाने संबंधीत शेतीच्या उतार्यांवर मूळ मालकांची नावे देखील लागलीत. तथापि, महसूल प्रशासनाकडून त्यांना या शेतजमीनीचा ताबा देण्यात आलेला नाही. या संदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करून देखील काहीही कार्यवाही न झाल्यामुळे या सावकारग्रस्त स्त्री-पुरूषांनी 23 जानेवारीपासून फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
दरम्यान, उपोषणाचा आज सहावा दिवस असून आजवर प्रशासनाने या उपोषणकर्त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. तर दुसरीकडे उपोषणात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेल्या उषाबाई टोपा जंगले, आशाबाई रवींद्र पाटील आणि सीमाबाई चंद्रकुमार फेगडे या तीन महिलांची प्रकृती आज खालावली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. चार दिवसांपासून उपोषण सुरू असून पोलीस व आरोग्य प्रशासनाने याची दखल घेतली असली तरी महसूल प्रशासन ढिम्म आहे. ते आमच्या मरणाची वाट पाहत आहे का ? महसूलच्या अधिकार्यांना सावकारांची इतकी काळजी कशासाठी ? असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे. या प्रकरणी अजून १२ जण उपोषण करत असून आता नेमकी केव्हा दखल घेतली जाणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.