फैजपूर, ता. यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा विनयभंग करून धमकावल्या प्रकरणी तालुक्यातील चिखली येथील बाप-लेकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला गावातील गोपाल भास्कर पाटील आणि त्यांचा मुलगा ऋषीकेश यांनी मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना २४ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.
या अनुषंगाने संबंधीत अल्पवयीन मुलीने फैजपूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यानुसार गोपाल भास्कर पाटील आणि ऋषीकेश गोपाल पाटील या दोघांच्या विरूध्द गुरनं ३७/२०२२ भादंवि कलम ३५४-ड; ३४१, ३२३, ५०४, ३४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस स्थानकाचे एपीआय सिध्देश्वर आखेगावकर हे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्री. आखेगावकर तसेच उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी चिखली बुद्रुक गावाला भेट देऊन पिडीत मुलीकडून माहिती जाणून घेतली.