‘मसाका’ची विक्री संशयास्पद ? : विक्रीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ !

फैजपूर-निलेश पाटील-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

तब्बल ४३ वर्षांची अतिशय उज्वल परंपरा असणारा मधुकर सहकारी साखर कारखाना म्हणजेच ‘मसाका’ हा विक्री करण्यात आला असून याच ठिकाणी खासगी मालकीचा साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. मात्र या विक्री प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता सिक्युरटायझेशन कायद्यान्वये ताब्यात घेऊन विक्री केली. या विक्री संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता जिल्हा बँक माहिती सभासदास देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मधुकर विक्री ही संशयास्पद तर नाही? ही शंका उपस्थित होत आहे. या विक्री संदर्भात जळगाव जिल्हा बँकेचे सभासद रमेश मोतीराम चौधरी रा. जळगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ३२ अन्वये लेखी माहिती जिल्हा बँकेला मागितली मात्र अद्याप पर्यंत जिल्हा बँकेने अर्जदार रमेश चौधरी यांना कुठलीही माहिती कागदपत्रे दिलेली नाही.

यामुळे मसाकाच्या विक्रीत काय गौडबंगाल आहे असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे? तक्रारदार यांनी सभासद या नात्याने माहिती मागितली की मधुकर च्या २७.१९ हेक्टर जमीन,प्लांट, मशिनरी व इमारत सह साखर कारखाना व डिस्टलरी विक्रीचा निर्णय दिनांक १०-११-२०२२ रोजी च्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला आहे. त्यांच्या दस्तऐवजाच्या नकला मिळाव्या यासाठी रमेश चौधरी यांनी जिल्हा बँकेला दिनांक २ नोव्हेंबर रोजी माहितीचा अर्ज सादर केलेला आहे. त्यांनी आठ मुद्द्यांच्या आधारे माहिती मागितली आहे.

१) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांनी मधुकर सहकारी कारखान्याबाबत दिनांक १३/४/२०२२ रोजी खासदार, आमदार, बँकेचे संचालक कारखान्याचे चेअरमन व संचालक यांच्या आयोजित सभेचे इतिवृत्त

२) बँकेने कारखान्याच्या विक्री करावयाच्या मालमत्तेचे मूल्यांकन.

३) मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीसाठी काढलेल्या दोन्ही जाहिराती.

४) मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीसाठी इच्छुकाने भरलेली निविदा व निविदेसोबत सादर केलेले कागदपत्र.

५) १०% इएमडी भरल्याबाबत अ- सदर रक्कम डिमांड ड्राफ्ट ने भरली असल्यास डिमांड ड्राफ्टची नक्कल ब- सदर रक्कम भरलेली असल्यास कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतून सदर एनइएफटी /आरटीजीएस केलेली आहे त्याबद्दलचे दस्तावेज.

६) दि १०-११-२०२२रोजी च्या बँकेच्या संचालक मंडळाच्या संस्थेतील मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीसाठी सभेचा ठराव.

७) मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीदाराला बँकेने दिलेला विक्री आदेश.

८) मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीदाराने दि१०/११/२०२२ नंतर भरलेली रकमेबाबत अ-किती रक्कम भरली. ब-सदर रक्कम डिमांड ड्रॉफ्टने भरली असल्यास डिमांड ड्राफ्ट ची नक्कल. क-सदर रक्कम एनइएफटी/ आरटीजीएस ने भरलेली असल्यास कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतून सदर एनइएफटी/ आरटीजीएस केलेली आहे.त्याबद्दलचा दस्तावेज.

या आठ मुद्द्यांच्या आधारे रमेश चौधरी यांनी जळगाव जिल्हा बँकेला माहिती मागितली असून अद्याप पर्यंत कागदपत्रे जळगाव जिल्हा बँकेने त्यांना कुठलीही माहिती सादर केलेली नाही.

या संदर्भात जिल्हा बँक सभासद रमेश चौधरी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, सभासद या नात्याने मी जिल्हा बँकेला अर्ज देऊन माहिती मागितलेली आहे अद्याप पर्यंत मधुकर विक्री संदर्भातली मला कुठलीही कागदपत्रे अथवा माहिती जिल्हा बँकेने दिलेली नाही मधुकर विक्री संदर्भात गोड बंगाल असल्याची दाट शक्यता आहे

Protected Content